School Pledge

विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले शाळेची प्रतिज्ञा

मी एक जागरूक विद्यार्थी म्हणून अशी प्रतिज्ञा करतो/करते की, मी माझे विद्यार्थी जीवन पूर्ण निष्ठेने आणि शिस्तीने जगून ज्ञानाची जोपासना करेन. कष्टाला घाबरणार नाही आणि नेहमी नवीन गोष्टी शिकण्यासाठी तत्पर राहीन.

मी माझ्या पालकांनी आणि कुटुंबाने माझ्या शिक्षणासाठी घेतलेल्या कष्टांचा मी सदैव आदर करेन. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता, त्यांना सन्मान मिळेल असेच माझे वर्तन असेल. मी माझ्या कुटुंबातील ज्येष्ठांची सेवा करेन आणि लहानांना योग्य मार्गदर्शन करेन.

मी समाजाचा एक जबाबदार घटक आहे, याची मला जाणीव आहे. मी जात, धर्म, पंथ या पलीकडे जाऊन माणुसकी जपण्याचा प्रयत्न करेन. सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करेन आणि पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहीन.

मी माझ्या शिक्षणाचा उपयोग केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी न करता, देशाच्या आणि समाजाच्या उन्नतीसाठी करेन. मी अंधश्रद्धा आणि वाईट व्यसनांपासून दूर राहीन आणि एक सुसंस्कृत नागरिक म्हणून आदर्श निर्माण करेन.

मी भारताचा सुजाण नागरिक म्हणून सर्व धर्मांचा आणि पंथांचा मनापासून आदर करीन. कोणाशीही धर्माच्या आधारावर भेदभाव करणार नाही आणि सर्वांना समान वागणूक देईन.

मी कोणत्याही अफवांवर, अंधश्रद्धेवर किंवा कट्टर विचारांवर विश्वास ठेवणार नाही. प्रत्येक गोष्टीचा विचार मी तर्क आणि पुराव्यांच्या आधारावर करीन आणि आपल्या देशात वैज्ञानिक दृष्टीचा प्रसार करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहीन.

मी समाजात द्वेष किंवा तेढ निर्माण होईल असे कोणतेही वर्तन करणार नाही. सर्वांशी प्रेमाने आणि एकोप्याने वागून देशाची अखंडता आणि सामाजिक सलोखा जपण्याची मी ग्वाही देतो/देते.

जय हिंद!

वरील प्रतिज्ञा सावित्रीबाई शाळेची अधिकृत सैवेधानिक प्रतिज्ञा आहे, जी १५ एप्रिल २०२६ पासून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी लागू केलेली आहे. वरील प्रतिज्ञेचा जस्याचं तसा वा बदल करून वापर अथवा उल्लेख शाळेच्या कार्यालयाच्या परवानगी शिवाय करण्यात येऊ नये.